देवेंद्र पाठक, धुळे : सद्याच्या परिस्थितीत जमिनीचा सेंद्रिय पोत अतिशय खालावली आहे. तो वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी कृषी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे अशी अपेक्षा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील यांनी बैठकीत व्यक्त केली.
धुळ्यातील कृषी महाविद्यालयातील विज्ञान केंद्रात शास्त्रज्ञ सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यावेळी संचालक डॉ. पाटील बोलत होते. याप्रसंगी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत पाटील, पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. तुषार आठरे, धुळ्याचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. इल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कुर्बान तडवी, निफाडचे डॉ. सुरेश दोडके, पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त डॉ. मिलिंद भंगे, धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. दिनेश नांद्रे, अविनाश गायकवाड, डॉ. खुशल बऱ्हाटे, डॉ. भगवान देशमुख यांच्यासह अन्य उपस्थित होते.
संचालक डॉ. पाटील म्हणाले, रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते, पाणी इत्यादी घटकांचा अतिवापर, एक पीक पद्धती या सर्व घटकांमुळे जमिनीवर विपरीत परिणाम होत आहे. त्या दृष्टिकोनातून सेंद्रिय पोत वाढवून जमिनीची सुपिकता वाढविणे गरजेचे आहे. ते म्हणाले, कधी काळी धुळे जिल्हा हा देशी जनावरांसाठी सर्वत्र परिचित होता. परंतु घटलेली देशी जनावरांची संख्या यामुळे दूध उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे. देशी जनावरांचे संवर्धन व पालन यासंदर्भात कृषी विज्ञान केंद्र आणि पशुसंवर्धन विभाग यांनी हातात हात घालून सोबत काम करणे ही आता काळाची गरज आहे. शेतकऱ्यांची शेती व्यतिरिक्त शेती पुरक उद्योगाची कास धरावी. त्याकरिता शेळीपालन, मक्षिका पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मत्स्य पालन, असे विविध उद्योग उभारणेकामी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवे असेही ते म्हणाले.
डॉ. इल्हे म्हणाले, आधुनिक शेती युगामध्ये कमी श्रमात अधिक उत्पादन मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेले वाण आणि विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शेतकऱ्यांनी बाजाराभिमुख पिकांचा अभ्यास करून त्यांची लागवड करावी असा सल्लाही त्यांनी दिला.
बैठकीदरम्यान, श्री अन्न नाचणी या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कुसुंबा येथील महेंद्र परदेशी यांचा सन्मान करण्यात आला.