धुळे/शिरपूर - राज्यात शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्याने महाविकास आघाडीला पायउतार व्हावे लागले. त्यामुळे, नुकतेच आमदार झालेले एकनाथ खडसे मंत्रीपदापासून आणखी दूर गेले. त्यातच, हे सरकार लवकरच कोसळेल असे भाकीतही एकनाथ खडसेंनी केले होते. त्यावर, आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
शिरपूर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्री विजयकुमार गावित यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंत्री महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर फडणवीस शिंदे सरकार कोसळेल या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले, एकनाथ खडसे यांना जर असे वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. एकनाथ खडसे यांनी मंत्री पदासाठी वरती वशिला लावून ठेवावा, कारण त्यांचा अपेक्षाभंग झाल्याने त्यांच्याकडून अशाप्रकारची वक्तव्ये केली जात आहेत, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला.
शिंदे-फडणवीसांमध्ये काय ठरंलय, मला कल्पना नाही
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला भाजपाचं कुणीही जाणार नसल्याचे यावेळी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच, दसरा मेळाव्यात यापूर्वीदेखील भाजपच कुणी गेलं असल्याचं आढळलेलं नाही. त्यामुळे यंदा देखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भाजपचं कोणी जाणार नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही ठरलं असेल तर मला कल्पना नसल्याचे देखील महाजन यांनी स्पष्ट केले आहे.