राजेंद्र शर्मा
धुळे : खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रौत्सवास बुधवारी थाटात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दिवसभरात १३०० मुलांचे जाऊळ काढण्यात आले. तसेच कुळधर्म, कुळाचारासाठी मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केल्यामुळे मंदिराचा परिसर फुलला होता. गुरुवारी दुपारी चार वाजता आदिशक्ती एकवीरा देवीची पालखी मिरवणूक मंदिर परिसरातून काढण्यात येणार आहे.
चैत्र महिन्यातील चौदसच्या दिवशी कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या मंदिरात जाऊळ काढण्याची परंपरा आहे. यंदाही लहान मुलांचे जाऊळ काढण्यासाठी अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यांसह मुंबई, पुणे, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ राज्यांतील भाविक बुधवारी मंदिरात दाखल झाले होते. मंदिरात सकाळी आदिशक्ती एकवीरादेवीची महापूजा व आरती मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते झाली. यावेळी मधुकर गुरव, मनोहर गुरव, चंद्रशेखर गुरव, सतीश चौधरी, पप्पू ठाकूर व मंदिरातील पुरीजा वर्ग उपस्थित होते. दुपारी महाआरती झाली. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात आदिशक्ती एकवीरा देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
कुलस्वामिनी एकवीरादेवीचा यात्रोत्सव अक्षयतृतीयेपर्यंत सुरू राहील. यानिमित्ताने यात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टने केले आहे.
मंदिर ते पंचवटीपर्यंत थाटली दुकानेपांझरा नदीपात्रात बच्चे कंपनीसाठी आकर्षण ठरणारे पाळणे व मनोरंजनाची साधनेही दाखल झाली आहेत. यात्रोत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. गेल्या वेळी पाळण्यात बसण्याचे जे शुल्क आकारले जात होते, त्यापेक्षा पाच ते दहा रुपये जादा शुल्क या वर्षी आकारले जाणार असल्याची माहिती पाळणेमालकांनी दिली.
चैत्रोत्सवात अनेक भाविकांच्या घरी कुळधर्म, कुलाचाराचा कार्यक्रम असतो. शुक्रवारी अनेक भाविकांनी कुलस्वामिनी एकवीरादेवीला नैवेद्य दाखविण्यासाठी मंदिर परिसरातच चुली मांडल्या होत्या. या चुलीवर महिला भाविक या मांडलेल्या चुलीवर कुलस्वामिनीला नैवेद्य दाखविण्यासाठी पुरणपोळी, मांडे, खीर, कणकीचे व पुरणाचे दिवे, भात, वरण हे चुलीवरच तयार करताना दिसून आले. नैवेद्यानंतर भाविकांनी मंदिर परिसरातच भोजन केले.