धुळे : अवधान एमआयडीसीतील प्लॉट नंबर ८ येथे वीज मिटरमध्ये हेराफेरी करुन वीज चोरी केल्याचा प्रकार उजेडात आला. ५५ लाखांची वीजचोरी पथकाने पकडली. दरम्यान, देवपुरात देखील वीज चोरी पकडण्यात आली. दोन जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत उत्तमराव कलोरे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, नकाणे रोडवरील एकवीरा नगरात राहणाऱ्या दोन जणांनी वीज मीटर बायपास करुन योग्य अशी विजेची नोंदणी होणार नाही अशी व्यवस्था केली. १६ मार्च २०२३ आदी चोवीस महिन्यापासून ३ हजार ११७ युनीट जवळपास ६६ हजार ६५ रुपयांची वीज चोरी केली. चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी घटना अवधान एमआयडीसी येथे वीज चोरीची घडली. एमआयडीसी येथील प्लॉट नंबर ८ येथे सुध्दा वीज मीटरमध्ये फेरफार करण्यात आले. वीज वापरायची नोंद होणार नाही अशा पध्दतीने व्यवस्था करुन ११ एप्रिल २०२३ आदी २२ महिन्यांपासून १४० लोडभारवर २ लाख ९९ हजार २५२ युनीटची वीजचोरी केली. एकूण ५५ लाख २२ हजार ५७० रुपयांची ही वीज चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.