देवेंद्र पाठक, धुळे: शिंदखेडा तालुक्यातील मुडावद गावात स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलिसांच्या पथकाने छापा टाकत विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या एकाला रंगेहात पकडले. भटू दत्तात्रय कोतकर (वय ५४, रा. मुडावद, ता. शिंदखेडा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
भटू कोतकर याच्याकडून २७ हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. त्यात १२ हजार ६४० रुपये किमतीची मॅकडॉल नं. १ व्हिस्कीच्या ९० मिली काचेच्या १५८ बाटल्या, ८ हजार १०० रुपये किमतीची मॅकडॉल नं. १ व्हिस्कीच्या १८० मिली ५४ बाटल्या, २ हजार ६५० रुपये किमतीची इंडिका गोल्ड व्हिस्कीच्या १००० मिली प्लास्टिकीच्या ५ बाटल्या, १ हजार २८० रुपये किमतीची इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिली काचेच्या ८ बाटल्या, २ हजार ५२० रुपये किमतीची डिप्लोमेट व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २१ बाटल्यांचा समावेश आहे. याबाबत पोलिस नाईक प्रशांत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित भटू कोतकर याच्याविरोधात नरडाणा पोलिस ठाण्यात मुंबई कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, नरडाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर व बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी संदीप सरग, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, संदीप पाटील, प्रशांत चौधरी, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी व दरबारसिंग गिरासे यांच्या पथकाने केली.