काही वर्षांपूर्वी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाऊस नसल्याने, खरीप व रब्बी हंगामातही मर्यादित उत्पन्न हाती येत होते. त्याचा परिणाम चारा टंचाईवर होत होता. जानेवारीपासूनच गुरांच्या चाऱ्याची चणचण भासत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही चांगले उत्पन्न येत आहे. यामुळे पाणी टंचाईबरोबरच चारा टंचाईही संपुष्टात आलेली आहे.
जिल्ह्यात जनावरांची संख्या १३ लाख ६४ हजार ४२९ एवढी आहे. २०२० मध्ये झालेल्या खरीप हंगामातील पिकापासून ३ लाख ५० हजार १५० मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. या शिवाय २०२० मधील रब्बी पिकांपासून १ लाख ५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झालेला आहे. पशुसंवर्धन विभाग व डीपीसी निधीतून ३१ हजार ५६३ मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे. असा एकूण ४ लाख ८६ हजार ७१३ मेट्रिक टन चारा जुलै २१ अखेरपर्यंत उपलब्ध असेल, असेही सांगण्यात आले.
दररोज ३४७० मे.टन चारा आवश्यक
जिल्ह्यातलहान-मोठ्या गुरांची एकूण संख्या तब्बल १३ लाख ६४ हजार ४२९ एवढी आहे. या गुरांसाठी दररोज ३ हजार ४७० मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. खरीप व रब्बी हंगामात झालेल्या दमदार पावसामुळे चाऱ्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता आहे, तेवढा सहज उपलब्ध होत आहे.
दुसऱ्या जिल्ह्यातून आयात करण्याची गरज नाही
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने, पशुपालकांना चारा टंचाईचा सामना करावा लागत होता. अनेक पशुपालक आपल्या गुरांसाठी जादा पैसे देऊन चाऱ्याची आयात करीत होते. तर काहींना चारा घेणे शक्य होत नसल्याने, असे पशुपालक पशुधन विक्री करीत होते. मात्र दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत असल्याने, दुसऱ्या जिल्ह्यातून चारा आयात करण्याची गरज भासत नाही.