धुळे : येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थीनीला एच ३ एन २ विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साेमवारी रात्री विद्यार्थीनीची एच ३ एन २ ची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. तिच्यावर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील काही विद्यार्थी हिमाचल प्रदेश येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर तीन विद्यार्थ्यांना ताप, अंगदुखी, सर्दी - खोकला अशी लक्षणे जाणवत होती. तिघांची एच ३ एन २ विषाणूची चाचणी करण्यात आली. एका विद्यार्थ्याची चाचणी निगेटिव्ह आली तर एकाचा चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे. विद्यार्थीनीच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील यांनी दिली.