धुळे : महिला पोलिसांच्या कामाचे चार तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आईचा वेळ मिळणार असल्याने महिला पोलिसांच्या पाल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महिला पालिसांना आतापर्यंत बारा तासांची ड्यूटी करावी लागत होती. मात्र, या निर्णयामुळे त्यांची ड्यूटी आठ तासांवर येणार आहे. धुळे जिल्ह्यात अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. नवे पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती मिळाली. नांदेड, नागपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये सदर निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कामाचे तास कमी होणार असल्याने कुटुंबातील सदस्यांना, लहानग्यांना वेळ देता येणार असल्याने महिला पोलिसांनी समाधान व्यक्त केले.
आता आईसोबत रोज खेळता येणार
आई व बाबा दोन्हीही पोलीस आहेत. ते दोन्हीही सतत कामात व्यस्त असल्याने आम्हा भावंडांना वेळ देऊ शकत नव्हते; पण आता आईची आठ तासांची ड्यूटी होणार असल्याने आम्हाला तिचा वेळ मिळणार आहे. तिच्यासोबत राहून नवीन गोष्टी शिकायला मिळतील.
-हंसिनी प्रशांत देशमुख,
आईच्या ड्यूटीचे तास कमी होणार असल्याने आनंद वाटला. आता तिच्यासोबत वेळ घालवता येणार आहे. तिच्यासोबत खेळायला मिळणार आहे. आधी तिला आमच्यासाठी वेळ नसायचा. आता तिला विविध पदार्थ बनवायला सांगणार आहे.
-डिंपल विठ्ठल पगारे
रात्री ८ वाजेपर्यंत ड्यूटी असल्याने आईला घरी येण्यासाठी आणखी उशीर व्हायचा आता तिची ड्यूटी लवकर संपणार आहे. त्यामुळे ती संध्याकाळीच घरी येऊ शकणार आहे. यापुढे तिची मला अभ्यासातही मदत होणार असल्याने आनंद झाला.
-नील तावडे