धुळे : भौतिक जीवनात वावरताना प्रत्येक नागरिकाने ग्राहक कायद्याच्या अभ्यास करणे आवश्यक आहे. या कायद्याची माहिती करून घेत प्रत्येकाने सजग रहावे, असे प्रतिपादन धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. व्ही. के. शेवाळे यांनी येथे केले.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातर्फे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन वेबिनॉरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, श्री. साळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेबिनारमध्ये तहसील कार्यालय धुळे ग्रामीण, शिरपूर, शिंदखेडा, साक्री येथील अधिकारी व कर्मचारी ऑनलाइन सहभागी झाले होते. याशिवाय फेसबुकच्या माध्यमातून लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आलेन्या. शेवाळे म्हणाले, ग्राहकांच्या संरक्षणासाठी १९८६ मध्ये केलेल्या कायद्यात २०१९ मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. ग्राहक आयोगाची जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशी त्रिस्तरीय रचना आहे. जिल्हा आयोगाला एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे चालविता येतात. बि-बियाणेविषयी तक्रारी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व तपशील जपून ठेवणे आवश्यक आहे. तसेच ग्राहक आयोगाकडे तक्रार कशी करावी? याविषयीची माहिती जाणून घेतली पाहिजे. फसव्या जाहिरातींविरोधात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॅरिटीकडे दाद मागता येते. तसेच एमआरपी याविषयी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.कांबळे म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे वेळोवेळी तपासणी मोहीम राबविण्यात येते. दोषींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येते. दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरावर समिती आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी मिसाळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाची माहिती देतानाच नागरिकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन केले.
प्रत्येकाने ग्राहक कायद्याचा अभ्यास करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:33 PM