मनीष चंद्रात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील लळिंग गावातील ऐतिहासिक किल्ल्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी व या किल्ल्यास गतवैभव मिळवून देण्याची आस मनात ठेवून त्यासाठी शहरात स्थापन झालेल्या किल्ले लळिंग संवर्धन समितीचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत. या समितीतर्फे दर रविवारी या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली जाते. आतापर्यंत किल्ल्यावर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. किल्ल्यावरील दगडांवर प्रेमीयुगुलांनी टाकलेली नावे, या समितीच्या पदाधिकाºयांनी पुसली असून येथे येणाºया पर्यटकांना किल्ल्यावर स्वच्छता ठेवावी, असा संदेश समितीतर्फे दिला जात आहे. मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक ३ धुळे शहरापासून अवघ्या सात कि.मी. अंतरावर गिरीदुर्ग प्रकारातील लळिंग किल्ला आहे. जमिनीपासून किल्ल्याची उंची १९९५ फूट आहे. किल्ले लळिंग संवर्धन समिती स्थापनेमागचा उद्देश निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या लळिंग किल्ल्याची गेल्या काही वर्षात दुरवस्था झाली होती. येथे येणारे पर्यटक, प्रेमीयुगुलांनी किल्ल्याच्या शिरोभागी बरीच अस्वच्छता केली होती. जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाºया या किल्ल्याची ही अवस्था पाहून शहरातील तरुण मंडळींनी किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी किल्ले लळिंग संवर्धन समिती स्थापन केली. या समितीत सुरेश सूर्यवंशी, संदीप पाटोळे, बबलू पाटील, हेमंत मोरे, खुशाल माळी, भटू वाघ, दीपक मराठे, राज बोधरी, महेश बागुल, दिनेश अहिरे, संदीप परदेशी, तुषार पवार, सुजल पवार, मनोज शिंदे, राजू महाराज या तरुण मंडळीचा समावेश आहे. आठ ते दहा वृक्षांचे रोपण किल्ले लळिंग समितीची स्थापना झाली. तेव्हापासून ते आजतागायत लळिंग किल्ला व परिसरात आठ ते दहा हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून या वृक्षांचे संवर्धनही केले जात आहे.
किल्ला दुरुस्तीसाठी ३० लाखांच्या निधीस मान्यतालळिंग किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा यासाठी किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या पदाधिकाºयांनी या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा केला. या माध्यमातून ३० लाख रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली असून या निधीच्या माध्यमातून किल्ला परिसरात पायºयांचे बांधकाम व इतर किरकोळ कामे केली जाणार आहे. हा निधी प्राप्त झाल्याची माहिती समितीच्या पदाधिकाºयांनी दिली आहे.
मुंबईत समितीच्या पदाधिकाºयांचा मंत्र्यांच्या हस्ते सन्मानमुंबई येथे गड स्वच्छता सन्मान सोहळा नुकताच पार पडला. या मोहिमेत किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या पदाधिकाºयांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबाबत राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन २०१६-१७ या कालावधीत पुरातत्त्व विभाग, वास्तू संग्रहालय, गड संवर्धन समितीच्या विद्यमाने राज्यातील विविध गडांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत किल्ले लळिंग संवर्धन समितीनेही सहभाग घेतला होता. समितीने किल्ल्यावर केलेली स्वच्छता मोहीम व पाच वर्षात काय काम केले आहे? याची माहिती शाासनाकडे सादर केली होती. त्याची दखल घेता हा सन्मान करण्यात आला.
दगड, मातीने बुजलेला हौद केला सुरूलळिंग किल्ल्यावर दगड, मातीने बुजलेला हौद समितीच्या पदाधिकाºयांनी नुकताच सुरू केला. हा हौद प्राचीन आहे. समितीचे पदाधिकारी दर रविवारी किल्ल्यावर गेल्यानंतर या हौदात पाण्याची साठवणूक करून येथे वृक्षांना पाणी देतात. तसेच दुर्गा मातेचे मंदिर परिसरातही स्वच्छता केली जाते.