सुरेश विसपुते धुळे - लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात विविध महिन्यात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मतदान घेतले जाणार आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवीन व आतापर्यंत काही कारणांनी वंचित राहिलेल्या अन्य मतदारांची नोंदणी करण्यास दोन-तीन वेळा विशेष मोहिमा राबविण्यात आला. त्या अंतर्गत सुमारे १० ते १२ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील तब्बल साडेसात हजार मतदारांनी फेब्रुवारी महिन्यात राबविलेल्या प्रत्येकी दोनदिवसीय दोन मोहिमांमध्ये नोंदणी केली आहे. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली असून ४ हजार ३०० दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे एकंदर मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी यावेळी मोठा उत्साह दिसून येत आहे. मात्र एकीकडे मतदारांची संख्या वाढत असली तरी प्र्रत्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येतो. कारण यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी ही बाब प्रकर्षाने दिसून आली आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मतदारांचाही त्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (इव्हीएम)सोबत निवडणुकीत आपण ज्या उमेदवारास मत दिले ते मत त्यालाच गेले किंवा नाही, याबाबत मतदारांना खात्री करून घेण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचाही वापर लोकसभेच्या निवडणुकीपासून केला जाणार आहे. त्यासाठी मतदारांना या नव्या यंत्राची ओळख व्हावी यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत मोठ्या गावांमध्ये तसेच बाजाराच्या दिवशी जाऊन तेथे डमी मतदान घेण्यात आले.ते करत असताना मतदारांना व्हीव्हीपॅट यंत्राचा वापराबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मतदारांनी त्याचा वापर करून खात्रीही केली. त्यामुळे त्यांच्यात ही यंत्रे वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. आता प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेपर्यंत मतदारांमध्ये मतदानाप्रती जागरूकता वाढविण्यासाठी अजून प्रयत्न होतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी मतदानाची प्रक्रिया तीन महिने चालणार असून त्यामुळे या काळात देशभरात स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, यात शंका नाही. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात आपले नाव आहे का, हे पाहण्याची संधी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली होती. त्या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्या-त्या मतदारयाद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर जिल्ह्यात राबविलेल्या मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकंदर लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत प्रशासनाकडून मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणखी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते. सामाजिक संस्था, संघटनांनीही त्यासाठी पुढे यावे व या राष्टÑीय कार्यात सहकार्य करावे. तरच जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीसह आगामी काळात होणाºया राज्य विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल, अशी अपेक्षा आहे.
मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 3:36 PM