धुळे : दोन आठवड्यांपूर्वीच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. त्यातच लग्नसराईचा हंगाम असल्याने, बसगाड्यांना प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. धुळ्यातून रेल्वेची पुरेशी सेवा नसल्याने, अनेकजण ‘लालपरी’ने प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून धुळे जिल्ह्यातील पाच आगारामार्फत विविध मार्गावर ४६ जादा बसेस सुरू केल्या आहेत. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद वाक्य जोपासत एस.टी.महामंडळाने ‘रस्ता तेथे एसटी’ असे वाहतुकीचे जाळे विणले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुणी लग्नासाठी तर कुणी सुटीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत असल्याने बसेसला गर्दी होत आहे. धुळ्यातून रेल्वेची सेवा मर्यादीत असल्याने, या परिसरातील प्रवाशी बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. प्रवाशांच्या गर्दीमुळे बसस्थानक फुलुन गेले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही आगारामार्फत ४६ जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.धुळे आगारातून शेगाव, मुबंई पुणे (अहमदनगर मार्गे), सोलापूर (औरंगाबाद मार्गे), सांगली (पंढरपूरमार्गे), नागपूर माहूरगड या जादा बस सुरू केल्या आहेत. तर साक्री आगारातून तुळजापूर (औरंगाबाद मार्गे), नाशिक (धुळे मार्गे), नाशिक (सटाणामार्गे) औरंगाबाद, पुणे (नाशिकमार्गे) या जादा बसेस सुरू केल्या आहेत. शिरपूर आगारातून पुणे (संगमनेरमार्गे), पुणे (नगरमार्गे), नाशिक, औरंगाबाद या, शिंदखेडा आगारातून नाशिक, स्वारगेट व दोंडाईचा आगारातून नाशिक, पुणे (नगर मार्गे) परभणी या जादा बसेस सुरू केल्या आहेत. जादा बसचा कालावधी १५जूनपर्यंत आहे. प्रवाशांनी जादा बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाच्या उत्पन्नात भरउन्हाळ्यानिमित्त तब्बल दोन महिने विविध मार्गावर जादा बसगाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. गर्दीच्या हंगामात जादा बसगाड्या सुरू केल्याने, त्याचा फायदा प्रवाशांना होऊ लागला आहे. एस.टी.चे भाडे जास्त असले तरी अनेकजण एस.टी.ने प्रवास करीत आहे. जादा गाड्यांमुळे महामंडळाचे उत्पन्नही वाढणार आहे. दरम्यान ज्या मार्गावरील बससेवा फायदेशीर राहील त्या मार्गावर बससेवा कायमस्वरूपी करण्यात यावी अशी मागणी आहे.
शिवशाही देवपूरहून सुटणारप्रवाशांच्या सोयीसाठी देवपूर बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र शिरपूर, नंदुरबारकडे जाणाºया जलद बसगाड्या या स्थानकात चालक नेत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत शिंदखेडा, नंदुरबार, इंदूरकडे जाणाºया सर्व बसेस देवपूर स्थानकात नेण्याचे सक्त आदेश विभाग नियंत्रकांनी सर्व आगारांना दिले आहेत. देवपूर परिसरातूनही पुण्याला जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे.प्रवाशांची सोय लक्षात घेता रात्री १० वाजता व १०.३० वाजता सुटणारी धुळे- पुणे शिवशाही बस आता देवपूर बसस्थानकातून सुटणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केलेले आहे.