धुळे : पोलिस असल्याची बतावणी करून धुळ्यातील बसस्थानकात वृद्धाच्या पिशवीतील दागिने लांबविणाऱ्या तोतया पोलिसाला पकडण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली. भिकन पंडित शर्मा (वय ५६, रा. तलाव गल्ली, पारोळा) असे आरोपीचे नाव आहे.
गोविंद बळीराम माळी (वय ६०, रा. सोमेश्वर प्लॉट, धुळे) या वृद्धाने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शेतीच्या कामासाठी पैशाची गरज असल्यामुळे माळी हे नाशिक येथे आपल्या मुलीकडे पैसे घेण्यासाठी गेले होते. मुलीकडून त्यांनी ५ ग्रॅमचे टोंगल आणि ४ ग्रॅमचे सोन्याचे कानातले, असे दागिने मोडण्यासाठी घेतले. एका डबीत ते ठेवून लाल रंगाच्या पिशवीत ते घेऊन नाशिक येथून धुळ्याला आला. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमरास ते धुळ्यातील बसस्थानकात उतरले. पिशवी ही थोड्या वेळासाठी खाली ठेवली असता, हे पाहून एक अनोळखी इसम माळी यांच्याजवळ आला. स्वत: पोलिस असल्याची बतावणी त्याने करत पिशवीत काय आहे याची विचारणा केली. घाबरून माळी यांनी पिशवीतील दागिने त्याला दाखविले. तोतयाने वृद्धाला बोलण्यात गुंतविले आणि डबीतील सोन्याचे दागिने शिताफीने लंपास केले. थोड्या वेळाने डबी उघडून पाहिल्यानंतर त्यात दागिने आढळून आले नाहीत. याप्रकरणी शहर पोलिसात रविवारी गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल होताच शहर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपासाची चक्रे फिरविली. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात भिकन पंडित शर्मा (वय ५६, रा. तलाव गल्ली, पारोळा) याला पारोळा येथून गोपनीय माहितीच्या आधारावर अटक केली. त्याच्याकडून ५ ग्रॅम वजनाचे १० हजार रुपये किमतीचे साेन्याचे टोंगल जप्त करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, भिकन शर्मा हा पूर्वी होमगार्डमध्ये होता. कामाची आणि बोलण्याची पद्धत त्याला माहिती असल्याने त्याने त्याचा गैरफायदा घेतला आणि पोलिस असल्याची बतावणी त्याने केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.