देवेंद्र पाठक, धुळे : विजेच्या खांबाला आधार दिलेल्या तारेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात घडली. धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुभाष उखा परदेशी (वय ५३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात राहणारे शिवदास सुभाष परदेशी हे सोमवारी आई कमलबाई सुभाष परदेशी यांच्यासोबत कुसुंबा गावातील शेतात कामास गेले होते. यावेळी शेतातील मक्याच्या पिकास त्यांचे वडील सुभाष उखा परदेशी (वय ५३) हे विहिरीच्या मोटारीतून पाण्याचा भरणा करत होते. या शेतात विजेचा खांब असून त्यावरुन वीज तारा गेल्या आहेत. या विजेच्या खांबाला आधार देण्यासाठी एका तारेचा ताण दिलेला आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटोपल्यावर आई आणि मुलगा हे दोघे घरी आले. मात्र त्यांचे वडील शेतात पाणी भरत असल्यामुळे ते एकटेच शेतात थांबून होते.
रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुभाष परदेशी हे घरी परतले नाहीत. म्हणून त्यांच्या शोधासाठी मुलगा शिवदास हा नातेवाईकांसोबत शेतात गेला. त्यावेळेस तारेला चिपकलेल्या अवस्थेत सुभाष परदेशी हे बेशुध्दावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांना तातडीने तारेपासून बाजूला सारत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉ. रिना साहू यांनी तपासून सुभाष परदेशी या शेतकऱ्याला रात्री साडेदहा वाजता मयत घोषीत करण्यात आले. याप्रकरणी शिवदास परदेशी यांनी दिलेल्या माहितीवरुन धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.