विंचुर (धुळे): गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पादन चांगले आले आहे. मात्र उत्पादन येताच भाव गडगडल्याने, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र भाव वाढण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कापसाची कोंडी सोडवावी अशी मागणी केली आहे.
विंचूर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली.त्यासाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. यावर्षी उत्पादनही चांगले आले आहे. सुरवातीला कपाशीला १० हजार रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. मात्र काही दिवसातच कपाशीचे भाव कमी होण्यास सुरूवात झाली. कपाशीला कमी भाव मिळत असल्याने, त्यातून उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले.
भाव वाढतील या अपेक्षेने अनेकांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र दोन महिन्यानंतरही कापसाचे भाव वाढण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने, शेतकरी हतबल झालेले आहे. एकीकडे महागाई गगनाला भिडत असताना, कपाशीला कमी भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. राज्य शासनाकडून कपाशीला भाव मिळत नसल्याने, येथील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून कापूस कोंडी सोडविण्याची मागणी केलेली आहे. निमगूळ परिसरातील शेतकऱीशांताराम पाटील, विजय मोरे, दत्तात्रय बोरसे, अजय मराठे, प्रवीण सोनवणे, जयवंत पाटील, तुकाराम पाटील, महेश सूर्यवंशी, अनिल ठाकरे, आकाश देवरे, सोनाली सपकाळे, दिलीप खिवसरा, गोकुळ देवरे आदींनी पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे.