शिंदखेडा - तालुक्यातील चिलाणे गावातील वासुदेव गुलाबराव सोनवणे (४६) या शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे सोनवणे यांचा मृत्यू ओढवला. सोनवणे यांनी मंगळवारी दुपारी शेतातच विषारी औषध प्राशन केले. त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात आल्याबरोबर त्यांना शिंदखेडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तत्काळ शिंदखेडा येथून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. वासुदेव यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. मात्र सतत होणारी नापिकी आणि दुष्काळामुळे हैराण होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर चिलाणे येथील स्मशानभूमीत बुधवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.