धुळे : कोरोना आजारामुळे आई आणि वडिलांचे निधन झाल्याने पोरक्या झालेल्या मुलांच्या मदतीसाठी डाॅक्टर आणि शिक्षक धावून आले असून, एक लाख ३५ हजार रुपयांची मदत जमवून या मुलांच्या नावे एफडी केली आहे. एफडीची कागदपत्रे शनिवारी मुला-मुलींच्या हातात देण्यात आली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. पतपेढीत शिपाई म्हणून काम करणारे गोकुळ माकडे, त्यांची पत्नी जयमाला माकडे, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार होता. माकडे दाम्पत्याचे एकाच दिवशी निधन झाले. दोन्ही मुले पोरकी झाली. दुर्दैवाने या दोन्ही मुलांचा कोरोना अहवालदेखील पॉझिटिव्ह आला. या संकटाच्या क्षणात डॉ. विशाल पवार यांनी इयत्ता बारावीत शिक्षण घेणारी प्राजक्ता माकडे आणि आठवीत शिकणारा चैतन्य माकडे या दोन्ही मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेत सर्व उपचार मोफत केले, तर औषधांसाठी लागणारी रक्कम मुंबई येथील बांधकाम अभियंता नवनीत ठाकूर यांनी केली. या मुलांवर औषधोपचार सुरू असताना डॉ. विशाल पवार यांच्यासह शिक्षक भारतीचे विनोद रोकडे, अश्पाक खाटीक यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अनाथ झालेल्या प्राजक्ता आणि चैतन्यच्या मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले. अवघ्या एक महिन्यात प्राजक्ता आणि चैतन्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक लाख ३५ हजार रुपयांची मदत उभी राहिली. त्यात विनोद रोकडे यांच्यासह त्यांची सर्व भावंडे, नाना महाले, खेमचंद पाकडे, नितीन माने, आबासाहेब पाटील, सचिन बाविस्कर यांनी पुढाकार घेतला. कुवेत देशातून डॉ. अभिजित सपकाळ, सौदी अरेबियातून कपिल देवांग अशा विभिन्न ठिकाणांवरून मदत उभी राहिली. एक लाख ३५ हजार रुपयांच्या या रकमेची प्राजक्ता माकडेच्या नावाने बँकेत एफडी करण्यात आली. या एफडीची रिसिट शनिवारी प्राजक्ता आणि चैतन्य यांच्या हातात देण्यात आली.
यावेळी डाॅ. विशाल पवार, शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव अश्पाक खाटीक, नितीन रोकडे, वाणी समाजाचे राजेंद्र चितोडकर, किरण बागुल, नानाभाऊ महाले आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. विशाल पवार यांचे भविष्यात कधीही मदत लागली तर हक्काने मदत करण्याचे आश्वासन अधिकच दिलासा देणारे राहिले.