धुळे : जिल्ह्यात रविवार २९ सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून धुळे, शिरपूर, सोनगीर व बेटावद येथील बालाजी वहनोत्सव व रथोत्सवांना प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण खान्देशातून भाविकांची उपस्थिती लाभते. या निमित्त मंदिरांवर नयनरम्य रोशणाईसह जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिरपूर येथेच भगवान बालाजी यांची एक नव्हे तर दोन मंदिरे असून राज्यातील ते असे एकमेव शहर गणले जाते.वहनोत्सवांतर्गत दैनंदिन विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. रोज वेगवेगळे वहन काढण्यात येते. काही ठिकाणी दसरा सणाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वहनोत्सवांची सांगता होते. त्यानंतर रथोत्सव साजरा केला जात असतो.भगवान बालाजी यांची उत्सवमूर्ती सुशोभित रथावर विराजमान करून नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात पार पडते.धुळ्यासह शिरपूर, सोनगीर व बेटावद येथील या वहन व रथोत्सवांना शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. शिरपूर येथे प्रतितिरूपती बालाजी मंदीर व श्री व्यंकटेश बालाजी मंदीर अशी दोन मंदिरे आहेत. खालचे गाव येथील श्री प्रतितिरुपती बालाजी मंदिरातील वहनोत्सवाला दिडशे तर श्री व्यंकटेश बालाजी मंदीरातील वहनोत्सवास १४५ वर्षांची परंपरा लाभली आहे.धुळे येथे शहरात खोल गल्ली या मध्यवर्ती भागात असलेल्या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला असून भव्य मंदीर उभारण्यात आले आहे.तालुक्यातील सोनगीर व शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथेही बालाजी वहनोत्सवाचा उत्साह दिसून येत असून यानिमित्त ग्रामीण भागात चैतन्य फुलल्याचे चित्र आहे. या कालावधीत बेटावद येथेही दोन वहनोत्सव पार पडतात. या सर्व उत्सवांसाठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
ुधुळे, शिरपूरसह चार ठिकाणी आजपासून वहनोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 1:10 PM