शिंदखेडा : तालुक्यातील लोहगाव व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून या परिसरात त्याने गाईचे लहान वासरूही फस्त केले आहे. परिसरात शेतात जाताना बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून येतात. तसेच काहींना बिबट्या दिसून येतो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. या भितीने शेतकरी व शेतमजूर शेतीकडे जाण्यास धजावत नाही. या भितीपोटी शेतीची कामे ठप्प पडली आहे.लोहगाव व परिसरात रस्त्यावर बिबट्या फिरतांना अनेकांना दिसत असल्याने सर्वामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीत मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून बिबट्याच्या धाकात कोणीच मजूर कामाला येत नाही. सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी येथील शेतकरी रतन देवरे, चंद्रशेखर पाटील, हेमंत माळी, काशीनाथ अहिरे, भागवत पाटील, ज्ञानेश्वर माळी, युवराज पाटील, महेंद्र पाटील, अशोक पाटील यांच्यासह गावातील असंख्य शेतकऱ्यांनी तहसीलदार शिंदखेडा व वनक्षेत्रपाल शिंदखेडा यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.शेतात कपाशीवर रोग पडला असून ऐन हंगामात शेतीची कामे वाढली आहेत. अशापरिस्थितीत मजूर न आल्याने व वरून सतत पाऊस चालू असल्याने सर्व मूग सडून गेले. तसेच मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून सदर बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरतील शेतकरी व शेतमजूरांनी केली आहे.
बिबट्याच्या धाकात तापी परिसर सुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:37 PM