धुळे : येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त असलेली चतुर्थ श्रेणीची पदे सरळसेवेने त्वरित भरावीत, अशी मागणी राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेने महाविद्यालयाकडे केली आहे.
याबाबत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, चतुर्थ श्रेणीची २२७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८२ पदे रिक्त आहेत. ही पदे सरळसेवेने तातडीने भरण्यात यावी. जोपर्यंत सरळसेवेने कर्मचाऱ्यांची भरती होत नाही, तोपर्यंत चतुर्थ श्रेणीतील पदे बाह्यस्रोतद्वारे भरू नये. महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांचा कोविड किंवा अन्य कारणाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या पाल्यांना तातडीने विनाअट शासकीय पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्तीवेतन योजना तत्काळ लागू करावी, मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात यावे, महाविद्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांच्या वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करावी, पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, संघटनेच्या कार्यालयासाठी महाविद्यालयाच्या परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, संघटनेला उपाहारगृह चालवण्यासाठी जागा द्यावी, महाविद्यालयातील जे कर्मचारी सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्त झाले आहेत, त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन द्यावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
या वेळी विशेष अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश चौधरी, चंद्रकांत भदाणे, विनोद सोनार, शरद बोरसे, देवा पगारे, अशोक शिरसाठ, सोमनाथ सोनार, अविनाश जाधव, सरलाबाई शिरसाठ, मीनाबाई गायकवाड, सुंदराबाई ठाकूर, बेबीबाई पाटील, कल्पनाबाई साळवे आदी उपस्थित होते.