शिरपूर : शिरपूर साखर कारखान्याचा ताबा धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेतर्फे अखेर शुक्रवारी संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला. तत्पूर्वी बॅँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संचालकांनी चार तास कारखान्याच्या सद्यस्थितीची संयुक्तपणे पाहणी केली.यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, डीआरडी कोर्टाचे श्रीकांत कोंडो, कारखान्याचे इंजिनिअर सी़झेड़ मराठे, चेअरमन माधव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, ज्ञानेश्वर पाटील, के़डी़पाटील, वासुदेव देवरे, भरत पाटील, संग्रामसिंग राजपूत, शाम करंकाळ, राहुल रंधे, डिगंबर माळी, ठाणसिंग पाटील, अॅडग़ोपाल राजपूत, मोहन पाटील, अॅड़पी़पी़ ऐंडाईत, सुरेश पाटील, दरबारसिंग जमादार आदी उपस्थित होते़ जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी यावेळी बॅँकेच्या ताब्यात असलेला कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिल्याचे जाहीर केले़२६ कोटी रुपयांच्या थकीत कर्जामुळे जिल्हा बँकेने २०१२ मध्ये शिसाकाची मालमत्ता जप्त केली होती़ या कारवाईस तत्कालीन संचालक मंडळातर्फे औरंगाबाद कर्जवसुली प्राधिकरणाकडे आव्हान देण्यात आले प्राधिकरणाने ही कारवाई अवैध ठरविली होती़ त्यामुळे बँकेने जप्त मालमत्ता शिसाकाकडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी घेण्यात आला नाही़ दरम्यान, जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा देण्यासाठी कर्जवसुली प्राधिकरण न्यायालयात दाद मागितल्यानंतर तो ताब्यात देण्याची सूचना केली. त्यामुळे संचालक मंडळ कारखान्याच्या ताबा घेण्यास तयार झाले.लवकरच बैठकीत दिशा ठरविणार कारखान्याचा ताबा मिळाल्याने आता लवकरच संचालक मंडळाची बैठक घेवून पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे चेअरमन माधव पाटील यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.दरम्यान कारखान्याचा ताबा मिळाल्याने शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठा हुरूप निर्माण झाला आहे.
‘शिसाका’चा ताबा अखेर संचालक मंडळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:26 PM