न्याहळोद : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन पाटबंधारे विभागातर्फे साक्री तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पातून बुधवारी दुपारी पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून दुष्काळी परिस्थिती असून गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेर व न्याहळोद ग्रामपंचायतीने प्रशासनाला निवेदन देऊन अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती.दरम्यान, नेर येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी ११ फेब्रुवारी रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, १३ तारीख उजाडली तरी पाणी सोडण्याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत होता.अखेर बुधवारी दुपारी पाटबंधारे विभागातर्फे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत गोपनियता बाळगली होती. राजकीय नेत्यांच्या अनुपस्थितीत हे पाणी सोडण्यात आले.येत्या तीन दिवसात हे पाणी धुळ्यात पोहोचेल. सुमारे १२ ते १५ दिवसात पांझरा नदीच्या अखेरच्या मुडावद गावाला हे पाणी पोहोचणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. यामुळे पुढील काळात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ९० तर अमळनेर तालुक्यातील १० अशा शंभर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत होणार आहे.दुष्काळाप्रती जिल्हाधिकारी उदासीन : शरद पाटील यांचा आरोपजिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून गंभीर दुष्काळी परिस्थिती असून गावागावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. पाणी व चाऱ्याअभावी शेतकºयांनी जनावरे विक्रीला काढली असून जिल्हा प्रशासनाकडे जनावरांच्या विक्रीची नोंद नाही. अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा पात्रात पाणी सोडण्याची मागणी डिसेंबरपासून शेतकºयांनी नोंदविली. मात्र, जिल्हाधिकाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी सोडण्यास विलंब झाला असल्याचा आरोप माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी केला आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी कधी बाहेर पडणार, तसेच जिल्हाधिकारी कचेरीपासून उपोषण व आंदोलनकर्त्यांना २०० मीटर लांब जेलरोडवर थांबवून जनतेच्या तीव्र भावनांपासून किती दिवस पळवाट काढणार आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच जिल्हाधिकाºयांच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री व विरोधी पक्षनेत्यांकडे तक्रार करणार असल्याचेही प्रा.पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
अखेर अक्कलपाडातून सोडले पांझरेत पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:02 AM