दीपक पाटील ।कापडणे : सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त असताना येथील महिला व पुरुष कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी तळपत्या उन्हात वीट भट्टीवर विटा तयार करण्याचे, विटा थापण्याचे काम भरदुपारी एक वाजेदरम्यान करताना दिसून येत आहेत. नुकताच १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन पार पडला. हा कामगार दिन जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येतो. जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस जागतिक कामगार दिन व राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जात असतो. मात्र, येथील वीटभट्टी कामगार या दिनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे या कामगारांच्या श्रमाचा सन्मान कोण आणि कधी करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.ग्रामीण कामगार दिशाहीनकापडणेसह संपूर्ण धुळे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून पर्जन्यवृष्टी सतत कमी होत असल्याने ग्रामीण भागात शेती व्यवसायात मजूर व कामगारांच्या हातांना काम नाही. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना शहरी भागात स्थलांतर करावे लागत आहे. तरुण पिढीही आता उच्च तांत्रिक शिक्षण घेत असून त्यांना रोजगार मिळणे काळाची गरज बनली आहे. वाढती लोकसंख्या व महागाईच्या काळात नोकरी, स्वत:चा व्यवसाय असणे हे जगण्याला एक आधार बनले आहे. मात्र, या गोष्टी ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील तरुण रोजगार निर्मितीसाठी शहरांकडे धाव घेत आहे. या मोठया शहरांमध्ये खेडेगावातून गेलेल्या तरूण कामगारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अत्यंत कमी वेतनात जगण्याचा मोठा संघर्ष करावा लागत आहे. कामगारांना या समस्यांपासून वाचविण्यासाठी ग्रामीण भागातच लहान-मोठे उद्योग, रोजगार उपलब्ध होणे काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून शासनाने पाऊल उचलण्याची अपेक्षा आहे.
वीटभट्टी कामगारांची रणरणत्या उन्हात अग्निपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 7:19 PM