शिरपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या उत्तम कामगिरीमुळे नाशिक विभागात शहराने सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाने शहराला संपूर्ण पश्चिम भारतात ३९ वे तर संपूर्ण भारत देशात ४९ वे उत्कृष्ट शहर घोषित केले आहे. ही बाब शहरवासियांच्यादृष्टीने अभिमानाची व भूषणावह असल्याचे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले.१९८५ पासून सर्वांना हेवा वाटावा असे शिरपूर शहर बनविण्याचे प्रयत्न सुरू असून शहरवासीयांचीही त्यास साथ मिळत आहे. स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. विशेषत: शहरातील खुल्या जागांसह नदी-नाले काठ्यावर लाखो वृक्ष लावून शहर हरित करण्यात आले आहे.एखाद्या शहराच्या विकास कल्पनेचे निकष जागतिक स्तरावर सिंगापूरप्रमाणे मानण्यात येतात़ तेथील विकासाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून होत असून त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत़ शहराचा प्रगतीचा आलेख उंचावत असल्याने शहराची लोकसंख्याच नव्हे तर घरसंख्येबरोबर क्षेत्रफळातही लक्षणीय वाढ झाली आहे. शहरवासियांना मिळत असलेल्या नागरी सुविधांमुळे हा लक्षणीय बदल झाला आहे. स्मार्टसिटीचे निकष पूर्ण करणाऱ्या शिरपूर नगरपालिकेस उत्कृष्ट नगरपालिका म्हणून सातत्याने गौरविण्यात येत आहे़ ‘स्मार्ट सिटी’चे निकष पूर्ण करणाºया शिरपूर नगरपालिकेस उत्कृष्ट नगरपालिका म्हणून ‘ब’ वर्गातून ३ कोटी रूपयांचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहे़ तसेच सन २००२ व २००५ मध्ये देखील संत गाडगे महाराज स्वच्छता अभियनात पालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला होता.अद्ययावत नागरी सुविधांमुळे शिरपूर शहराचा विकास सर्वांगाने झाला आहे़ शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज व पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण पूरक योजना आदींमुळे शिरपूरचा सर्वांगीण ‘टेकआॅफ’ झाला आहे़स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर, हरित शिरपूर कायमस्वरूपी राहण्यासाठी स्वच्छतेचा वसा कायमस्वरूपी जपण्याचे आवाहन वेळोवेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे. तसेच सातत्याने व नियमितपणे नगरपरिषदेचे कामकाज आदर्शवत सुरु ठेवले आहे.केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिंमेत दरवर्षी शिरपूर नगर परिषदेने उल्लेखनीय काम केले आहे. या गौरवामुळे पालिकेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला असून नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
शिरपूर पालिका विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:39 PM