दोंडाईचा : गणपती बाप्पा मोरया ,पुढचा वर्षी लवकर या .....अशा जयघोषात मोठ्या भावपूर्ण वातावरणात रविवारी सात दिवसासाठी विराजमान झालेल्या ३३ सार्वजनिक मंडळ व घरगुती अशा सुमारे २२० गणेश मूर्र्तींचे वाजत गाजत ,ढोल-ताशाचा गजरात शेकडो भाविकांनी सारंगखेड़ा येथील तापी नदीत विसर्जन केले. दरम्यान मोठया पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जसन शांततेत झाले.हरीहर भेट - दोंडाईचा येथील आझाद चौकात दादा गणपति व बाबा गणपती आणि विरभगतसिंग गणपती गणेश मंडळाची समोरासमोर भेट होते. ती भेट पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी आझाद चौकात असते. नेहमीप्रमाणे ही भेट आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाली. यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गुलाल, फुलांची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. हरिहर भेटीनंतर जामा मशीद मार्गे एक एक गणपती विसर्जनाकडे मार्गस्थ झाला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोंडाईच्याची संवेदनशील शहरात गणना होत असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलिस प्रमुख विश्वास पांढरे, शिरपुर पोलिस विभागीय अधिकारी अनिल माने व जिल्हा गुन्हे अन्वेषणचे हेमंत पाटील यांचा मार्गदर्शनखाली दोंडाइचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे राकेश खांडेकरसह पाच पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक, १२० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलिसांचे एक प्लाटून, 70 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते.शहरात गणेश विसर्जन मिरवणुका रात्री उशीरापर्यंत शांततेत सुरु होत्या. यावेळी गणेश मंडळांकडून मोठ्याप्रमाणावर गुलालाची उधळण करण्यात आली.
गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 10:03 PM