बळसाणे : माळमाथा परिसराला दुष्काळाचा फटका बसला असून चारा टंचाईने पशुपालक बेजार झाले आहेत. मजुरांच्या हाताला काम नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्वरित उपाय योजना कराव्या, अशी मागणी होत आहे.गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे साक्री तालुक्यातील निजामपूर, जैताणे, बळसाणे, दुसाणे, इंदवे, हाट्टी, लोणखेडी, कढरे, आगरपाडा, घानेगाव, फोफरे, वाघापूर, ऐचाळे, सतमाने, हुंबर्डे, नागपूर, वर्धाने, छावडी, परसुळे आदी माळमाथा भागातील पशुपालकांना यंदा चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चाऱ्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दुसरीकडे पैसे मोजूनही चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक विवंचनेत आहेत.गेल्यावर्षी माळमाथा परिसरात पावसाने सरासरी गाठलीच नाही. या परिसरात अत्यंत कमी स्वरूपाचा पाऊस झाल्याने प्रकल्प, नदी, नाले, बंधारे, विहिरींमध्येही समाधानकारक जलसाठा होऊ शकला आहे.उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. पाण्याच्या टंचाई असल्याने माळरानावर कुठेही हिरवे गवत दिसत नाही.उजाड माळरानावर कुसळावैरणावर तोंड फिरवणारी जनावरे पोटभर चारा मिळत नसल्याने कृश झाली आहेत. गुरांचे पोट आत गेले असून हाडे वर आलेली आहेत, अशी स्थिती साक्री तालुक्यासह माळमाथा परिसरात निर्माण झाली आहे.दुष्काळामुळे चाराटंचाई निर्माण झाली असून परिणामी शेतकरी व पशुपालक बेजार झाले आहेत. परजिल्ह्यातून किंवा तालुका बाहेरुन चाºयाची जमवाजमव शेतकऱ्यांकडून केली जात आहे. साक्री तालुका हा दुष्काळी जाहीर केला आहे. मात्र विविध योजना आणि सवलती अद्यापही राबविण्यात आलेल्या नाहीत.यंदा तालुक्यात अल्प पावसाची नोंद आहे. त्यामुळे खरीपाबरोबरच रबीचा हंगामही हातचा गेला आहे. रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी झालीच नसल्याने चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे.दुष्काळामुळे पाण्याचे स्त्रोतही कोरडे झाले आहेत. चाराटंचाई बरोबरच पाणी टंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. आगामी चार महिने पशुधन कसे जगावयाचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
चाराटंचाईने पशुपालक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:00 PM