नेर : मुस्लिम धर्मात पवित्र मानला जाणारा रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त नेर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी नियमांचे काटेकोरपालन करावे, घरीच नमाज पठन करावे असे आवाहन पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले.धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए.एस. ठाकरे, पी.एन. चव्हाण, पोलीस नाईक प्रमोद ईशी, धीरज सांगळे यांनी नेर दूरक्षेत्राच्या आवारात गावातील मुस्लिम ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्त्यांसह ही बैठक घेण्यात आली.तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे व उपनिरीक्षक गजानन गोटे यांनी नेर गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम पंच आखाडा पश्चिम भाग, मुस्लिम पंच मुख्य बाजारपेठ मुस्लिम समाजातील विविध समाजसेवक पदाधिकारी यांच्या सहभागातून योग्य असे निर्णय घेतले.जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आता ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने व कोरोना आजार संसर्गजन्य व संक्रमित असल्यामुळे परस्परांशी संबंध टाळण्यासाठी स्वत:चा व इतरांचा बचाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे होऊ घातलेले सण नियमित साजरा करत असतो. परंतु या परिस्थितीत या सणांवर निर्बंध घालावा लागणार आहे.यात रमजान ईद या दिवशी गावातील दोन मशिद व ईदगाह या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी जास्त गर्दी करू नये.तसेच मशिद व ईदगाह याठिकाणी मुस्लिम पंच कमिटीतून एकूण तीन व्यक्तींनी आत जाऊन आजान तसेच नमाज पठण करावे इतरांनी त्याठिकाणी गर्दी करू नये. आपापल्या घरातच नमाज पठण करून घ्यावी. यामुळे निश्चितच एकमेकांशी संपर्क राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी इतर समाज बांधवांनी आपल्या दूरध्वनी मार्फत आपल्या मुस्लिम बांधवांना, मित्रांना ‘ईद मुबारक द्यावी’ या उपक्रमातून निश्चितच कोरोनाशी लढा देऊ.तसेच गावातील विनाकारण गर्दी टाळा, किराणा दुकाने सकाळी व सायंकाळी दोन ते तीन तास खुली ठेवावीत. अत्यावश्यक सेवा म्हणून दूध तसेच भाजीपाला सकाळी अथवा सायंकाळी ठराविक वेळेसाठी खुली करावीत. असे निर्णय व आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले आहे.या बैठकीत नेरचे सरपंच शंकरराव खलाणे, उपसरपंच पंढरीनाथ शंखपाळ, ग्रामपंचायत सदस्य देविदास माळी, धर्मा माळी, नामदेव बोरसे, डॉ.सतीष बोढरे, मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष लतीफ तांबोळी, सचिव शौकत जहागीरदार, संचालक रुबा सुपडू, इनुस शेख, जाकीर तांबोळी, गुड्डू शेख, पोलीस पाटील विजय देशमुख, रतिलाल माळी, गोरख पगारे, राजेंद्र मगरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियमांचे पालन करा,घरीच नमाज पठन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:24 PM