प्रारंभी दिसलेला प्राणी बिबट्या की तरस याबाबत शंका होती. खामखेडा येथील जयवंत पाटील व सागर पाटील या शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली असता वनसंरक्षक आनंद मेश्राम, संदीप मंडलिक, वैशाली कुवर, ज्ञानेश्वर शिरसाट, प्राणी मित्र योगेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतात जाऊन पाऊलखुणा तपासल्या असता यावरून या भागात बिबट्याचा संचार असल्याचे निष्पन्न झाले. उसाच्या शेतामध्ये बिबट्याचा वावर असल्याने परिसरात शेतकरी, सालदारकी करणारे कुटुंब यांच्यात दहशत निर्माण झालेली आहे, म्हणून त्यांनी शेतातून आपली वस्ती गावाकडे वळवलेली आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात कॅमेरा व पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतात मशागती करण्यासाठी शेतकऱ्यांना रोज जावे लागते. परंतु शेतात बिबट्याचा वावर आहे म्हणून वखरणी व त्याचबरोबर कापूस लागवड व इतर कामांसाठी शेतकऱ्यांना शेतात बिबट्याच्या भीतीमुळे जाता येत नाही म्हणून लवकरात लवकर त्या बिबट्याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सागर पाटील व जयवंत पाटील यांनी केली आहे.