लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : बारीपाडा वनभाजी स्पर्धेतूनच देशभरात भाजी स्पर्धा सुरू झाली आहे. हे एक शाश्वत काम असून भविष्यात जैवविविधता टिकवून ठेवण्याचे उत्तम काम या ठिकाणी चैत्राम पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून टिकवून ठेवले आहे. हे काम संपूर्ण देशात नेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, जैवविविधता टिकवून ठेवल्यास भविष्यात येणाºया पिढीला याची मोठी गरज निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमचे अखिल भारतीय संघटनमंत्री अतुल जोग यांनी केले.साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे रविवारी वनभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनवासी कल्याण देवगिरी प्रांतचे सचिव मंदार म्हसकर, वनवासी कल्याण देवगिरी प्रांतचे अध्यक्ष चैत्राम पवार, जि.प. सदस्य विलास बिरारीस, प्रा.पुष्पा गावित, माजी महापौर मंजुळा गावित, सरपंच सिंधूबाई पवार, डॉ.तुळशीराम गावीत, इंजि. मोहन सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.स्पर्धकांनी मांडल्या विविध भाज्याया स्पर्धेत जंगलातील औषधी व विविध भाज्यांचा समावेश करण्यात आलेला होता. महिला स्पर्धकांनी आळीब, फांद्या, ओवा, बाफळी, बांबू कोम्ब, कडव्या, हळूद, केलभाजी, कोहळा, चंदका, चित्रक, देवारी, गोगल, गोमठ, जंगलीचुच, मेका, मोका, नागगुल, राजगिरा, रानतुळस, सोनरु, सोलव्या नींबू, शिरिसफुल, तुराठा, उलशि, वनदोडका, वनस्पतिच्या मुळया पाने फुले, खोड साल, बी, इत्यादी ८० ते ९० प्रकारच्या वनभाज्या स्पर्धेत सादर केल्या. स्पर्धेत परिसरातील मोगरपाडा, शेंडवड, चवडी पाडा, मांजरी, मापलगाव या गावातील आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एका महिलेने तब्बल ८० भाज्या तयार केल्या होत्या. तर एका स्पर्धकाने ७३ भाज्या बनवल्या, दुसºया एका महिलेने ५८ भाज्या स्पर्धेत सादर केल्या. त्यांचे ताट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेतील विजेतेवनभाजी स्पर्धेत प्रथम क्रमांक ताराबाई गजमल कांबळे (लव्हरदोडी), द्वितीय प्रियंका परशुराम अहिरे (जाड), तृतीय योगिता कैलास साबळे (काकशेवडे) तर उत्तेजनार्थ पारितोषिक विमलबाई गोरख पवार (बारीपाडा), व वैशाली गणेश बागुल (मोगरपाडा) यांनी मिळविले. विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचे परिक्षणवनभाजी स्पर्धेचे परिक्षण साक्री तालुका विज्ञान मंडळातील शिक्षक तसेच डॉक्टर, जाणकार मंडळींकडून करण्यात आले. परिक्षक म्हणून पी.झेड. कुवर, उज्वला पोद्दार, अमृता चव्हाण, बी.एम. भामरे, डी.व्ही. सूर्यवंशी, बी.बी. बिरारीस, मोतीलाल पोतदार, डॉ.सचिन नांद्रे, के.एस. बच्छाव, पी.एन. गांगुर्डे, पी.डी. पाटील, रवी खैरनार, मनीषा पाटील, डॉ.विजया अहिरराव, जोशीला पगरिया, सुहास सोनवणे, अनिल अहिरे, चेतन राजपूत, संजय देसले, संगीता पाटील यांनी काम पाहिले.
बारीपाड्यात दरवळला वनभाज्यांचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:34 PM
साक्री तालुका : वनभाजी महोत्सवात स्पर्धकांनी सादर केल्या विविध दुर्मिळ भाज्या, मान्यवरांच्याहस्ते विजेत्यांचा गौरव
ठळक मुद्देस्पर्धकांनी मांडल्या विविध भाज्यास्पर्धेचे परिक्षण आणि विजेत्यांचा सन्मान