धुळे : मोहाडी उपनगरातील राहुल मैंद या तरुणाच्या खून प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे़ याप्रकरणातील संशयित चॅम्पियनसिंग भादा याच्या घरावर याच्या घरावर हल्ला करीत घरच जाळून टाकल्याची घटना सोमवारी सकाळी घडली़ याप्रकरणी १५ जणांविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर धरपकड करीत ४ जणांना अटक करण्यात आली़ त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली़२७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संशयित चॅम्पियनसिंग भादा हा राहुल मैंद याच्या खूनात सामील असल्याच्या रागातून एका टोळक्याने भादा याच्या घरावर हल्ला केला़ हातात लाठ्या-काठ्या घेऊन अनाधिकारपणे घरात प्रवेश करुन घराला आग लावून दिली़ त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ तसेच गिताकौर भादा हिच्या नातेवाईकांच्या घरातील सामानाची तोडफोड करुन हैदोस माजविला होता़ शिवीगाळ करुन टोळके पळून गेले होते़ यावेळी काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते़या घटनेनंतर भेदरलेल्या गिताकौर किस्मतसिंग भादा (४०, रा़ बंद साबण कारखान्यामागे, तिखी रोड, मोहाडी) यांनी रात्री साडेनऊ वाजता फिर्याद दिली़ त्यानुसार मयूर आटोळे, भैय्या मिंड, बन्सी गोसावी, सागर धुमाळ, ललित दारुवाला, गोपाळ पानगे, रविंद्र उर्फ अण्णा चव्हाण, निलेश जगताप, राहुल कुवर, मनोज पाटील, बाबा गोसावी यांच्यासह ३ ते ४ जण यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़पोलिसांनी धरपकड करुन मयूर आटोळे, भैय्या मिंड, बन्सी गोसावी, सागर धुमाळ यांच्या मुसक्या मोहाडी पोलिसांनी आवळल्या़ त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
अटकेतील चौघांना एका दिवसाची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:05 PM