धुळे : वारसा हक्काने सफाई कामगार या पदावर नोकरी मिळावी म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आले. खोटा अनफिट असल्याचा दाखला मिळवून तो महापालिका आयुक्तांकडे दाखल करण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी गंगूबाई गाेपीचंद मरसाळे (वय ६२, रा. एकवीरा अमरधाम रोड, देवपूर, धुळे) या महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, २० ऑक्टोबर २०२१ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान, महापालिका व भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात हे कृत्य करण्यात आले. गंगूबई मरसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हर्षलदीप किशोर वाघ यास वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नोकरी मिळविण्यासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गंगूबाई मरसाळे या अनफिट आहेत, असा खोटा दाखला तयार करून घेण्यात आला.
गंगूबाई यांची संगनमताने दिशाभूल आणि विश्वासघात करून महापालिकेच्या आयुक्तांकडे हा दाखला दाखल करून घेण्यात आला. गंगूबाई हिने या घटनेची कुठेही वाच्यता करू नये म्हणून धुळ्यातीलच चौघा संशयितांनी १४ मार्च २०२२ रोजी हातउसनवार पावतीवर खोटा आशय तयार करून गंगूबाई मरसाळे या महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.