धुळे : केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा (सीआरआयएफ) या कार्यक्रमातून आर्वी ते कुळथे रस्त्यावर धाडरा-धाडरी गावाजवळ बोरी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी सुमारे चार कोटी ७९ लाख ३२ हजार रुपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. या पुलाच्या कामासाठी खासदार भामरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
पुलाच्या कामाला त्वरित तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना केंद्राने राज्य सरकारला केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याच्या सचिवांना दोन आठवड्यांपूर्वी तसे आदेश प्राप्त झाले आहेत.
आर्वी-धाडरे-कुळथे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५१ वरील धाडरा-धाडरी गावाजवळ दगडी फरशीचे बांधकाम केले होते. सन २०२० साली सदरची फरशी पूर्णपणे तुटल्यामुळे आर्वीकडून धाडरा-धाडरी-कुळथे-होरपाडा-नंदाळे-बोरकुंड या गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. या समस्येबाबत धाडरा, धाडरी, कुळथे येथील सरपंच आणि ग्रामस्थांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली. त्यानंतर भामरे यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करून निधी मंजूर करून घेतला. निधी मंजूर केल्याबद्दल खासदार भामरे यांनी मंत्री गडकरी यांचे काैतुक केले.
आर्वी-धाडरा-धाडरी-कुळथे प्रजिमा ५१ या रस्त्याचे काम सन २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झाले होते. आर्वी-धाडरे-कुळथे होरपाडा बोरकुंडचा रस्तादेखील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्यात आला; परंतु बोरी नदीचा पूल पूर्णपणे तुटल्यामुळे सदर रस्त्याचा उपयोग कमी झाला होता.