धुळे : विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार आहे़ विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत़ धुळ्याच्या सर्वांगिण विकासासाठी एकही पैसा कमी पडू दिला जाणार नाही़ धुळेकरांना रोज पिण्याचे पाणी कसे दिले जाईल याचे नियोजन करणार असल्याचे आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी धुळ्यातील सभेत दिले़ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे धुळ्यातील गोंदूर विमान तळावर दुपारी १२ वाजून २२ मिनीटांनी आगमन झाले़ यावेळी माजी मंत्री डॉ़ सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भूसे, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी, हेमंत साळुंखे, भाजपचे मनोहर भदाणे, अतुल सोनवणे, संजय गुजराथी, अॅड़ पंकज गोरे, रविंद्र काकड, राजेंद्र पाटील, गुलाब माळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़ या पदाधिकाºयांनी उध्दव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले़ यानंतर लगेच ठाकरे हे विशेष हेलिकॉप्टरने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील सभेकडे रवाना झाले़ त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत होते़ धडगाव येथील सभा आटोपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने पुन्हा गोंदूर विमानतळावर दाखल झाले़ आणि धुळे शहरातील महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या उमेदवारी प्रचारार्थ क्युमाईन क्लब समोरील जागेवर सभास्थळी उध्दव ठाकरे यांचे आगमन झाले़ त्यावेळी सभेत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले़ उध्दव ठाकरे म्हणाले, केवळ विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत़ सध्यस्थितीत विरोधकच राहिला नसल्याचे चित्र राज्यात सर्वदूर दिसत आहे़ तुमच्या हक्काचा आमदार आणि राज्यात सरकार असणार आहे़ शरद पवार हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणतात़ तुम्ही स्वस्थ बसूच नका़ कारण हे सरकार पडणार नाही असा विश्वास आहे़ नागरीकांना आरोग्याच्या सुविधा नाममात्र दरात दिल्या जातील़ केंद्रात आपले सरकार आहे, तर राज्यात देखील आपलेच सरकार येऊ द्या़ ते म्हणाले, आम्ही धुळे ग्रामीणमध्ये दिलखुलास मदत करत आहोत़ तर, धुळे शहरात देखील दिलखुलास मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली़
धुळ्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 3:18 PM