धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीला बंदी असल्याने शहराच्या विविध भागात गणेश विसर्जन तसेच निर्माल्य संकलन यासाठी पूर्व नियोजन व आखणी करण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत आज पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती़ त्यात विसर्जन मिरवणुकीला बंदी घालण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले़ यंदाच्या गणेशोत्सवात कोरोनाचे सावट असल्याने विसर्जन मिरवणुकीला बंदी घालण्यात आलेली आहे़ त्यामुळे प्रत्येक प्रभागातच मूर्ती विसर्जन व निर्माल्य संकलनची सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल याबाबत चर्चा विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यासंदर्भात प्रभागात महत्वाच्या ठिकाणी विसर्जन व्यवस्था व निर्माल्य संकलन व्यवस्था करण्यात येत असून त्याचा आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे़ या बैठकीस डीवायएसपी सचिन हिरे़ आझादनगरचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपायुक्त शांताराम गोसावी, सहायक आयुक्त तुषार नेरकर, विनायक होते, सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव उपस्थित होते़
धुळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 6:42 PM