दोंडाईचा : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता आगामी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. राज्य शासनाचा या सुचनांचा आदर करीत दोंडाईचातील सर्व मंडळांनी आगामी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. परंतु दोडाईचा शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा पारंपारिक मार्ग आगामी काळात कायम असावा़ त्यात फेरफार करू नये, अशी मागणीही मंडळ पदाधिकाऱ्यांनी केली आहे.सुमारे शंभर वर्षांची परंपरा आलेल्या दोंडाईचा शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाचा गजरात वाजत गाजत स्वागत व विसर्जनही होते. दोंडाईचा शहरात मानाचा दादा गणपती, मानाचा बाबा गणपती, विर भगतसिंग मित्र मंडळ यांच्यासह गणपती मंडळे प्रसिध्द आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत आझाद चौकात होणारी हरिहर भेट बघण्यासाठी हजारो भक्तगण जमतात. हा क्षण टिपण्यासाठी सर्वभक्तगण अक्षरश: वाट पाहतात. पुढे ही मिरवणूक मशीद मार्गे जाऊन तापी नदीत गणरायाचे विसर्जन होते. परंतु या वर्षी कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे आगामी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे शासनाने सूचित केले आहे.त्यात सार्वजनिक गणेष मंडळाची मूर्तीची उंची ४ फूट तर घरगुतीमूर्ती २ फूट असावी, नागरिकांनी गर्दी करू नये, आॅनलाईन दर्शनावर भर द्यावा, सार्वजनिक कार्यक्रम न करता रक्तदान शिबिर घ्यावे आदी १२ मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मागील वर्षी दोंडाईचात ३३ सार्वजनिक गणेश मंडळ व सुमारे २ हजार २०० घरघुती गणेश मूर्ती विराजमान होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांसह इतरांचे म्हणणे आहे. नागरिकांनी देखील याला प्रतिसाद द्यायला हवा़धार्मिक कार्यक्रम महत्वाचे असले तरी कोरोनात जीवितहानी टाळणे म्हत्वाचे आहे. शासनाच्या सुचनांप्रमाणे साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करू. पण पारंपरिक मिरवणूक मार्गात खंड पडला म्हणून पुढील वर्षी मार्गात बदल करू नये. तोच मार्ग कायम ठेवावा, असे वीर भगतसिंग गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष बळीराम पाटील यांनी सांगितले़ तर कोरोना असल्याने शासनाच्या नियमाचे पालन करून मोजक्या सदस्यां सह गणेशोत्सव साजरा करू , असे दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष मनोज रामोळे यांनी सांगितले़
दोंडाईच्यात गणेशोत्सव शासनाच्या सूचनेनुसारच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 10:57 PM