लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर-वरवाडे नगर पालिकेतर्फे फक्त महिलांसाठी असलेल्या बगीच्याचे (इव्ह पार्क) लोकार्पण गुरुवार ४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात येत आहे. राज्यातील अभिनव हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. शिरपूर शहरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून महिलावर्गाासाठी अतिशय उत्कृष्ट असे इव्ह पार्क हा नावीन्यपूर्ण बगीचा उपलब्ध करून देण्यात आला आहे.शहरात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मुकेशभाई पटेल रिक्रिएशन गार्डन, अॅम्युजमेंट पार्क, नानानानी पार्क यानंतर आता इव्ह पार्क हे खास महिलांसाठी असलेले उद्यान शिरपूरकर यांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे.या इव्ह पार्क महिलांसाठी बनविण्यात आलेल्या गार्डनसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून संरक्षक भिंत व इतर बाबींसाठी खर्च करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या फंडातून पाच लाख रुपये ओपन जीम साहित्य व इतर बाबी साठी खर्च केला आहे. एकूण २० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एस. व्ही. के. एम. संस्था एन. एम. आय. एम. एस. मार्फत सहकार्य करण्यात आले. त्यांच्यामार्फत विविध फुलझाडे, शोभेची महागडी रोपे व इतर खर्चिक बाबींसाठी योगदान देण्यात आले आहे. २५हजार स्क्वे. फूट जागेवर हा इव्ह पार्क उभारण्यात आला आहे. तेथे महिलांसाठी गुजरात येथून महागडी रोपे, खास बैठक व्यवस्था करण्यात आली असून येथे जॉगिंग ट्रॅक, लॉन्स, योगासाठी खास सोय, चर्चासत्र व विविध कार्यक्रम साठी व्यवस्था, चांगली लाईट व्यवस्था, शौचालय इत्यादी उपलब्ध केले आहे. महिलांसाठी गार्डन सकाळी व संध्याकाळी ५ ते ९ यावेळेत खुले राहिल. येथे नेहमी सिक्युरिटी व गार्डनर राहतील. महाराष्ट्र राज्यातील अभिनव अशा या नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.
फक्त महिलांसाठी असणार बगिचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:15 PM