धुळे : जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची टेस्टींग अपयशी झालेले आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना नवीन योजना देऊन पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच हट्टी खुर्द येथे शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावी अशी मागणी सदस्यांनी स्थायीच्या सभेत केली.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या सभेला कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, शिक्षण सभापती महावीरसिंग रावल, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. उपस्थित होत्या.
साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी ११ शिक्षकांची गरज असताना केवळ आठच कार्यरत आहे. त्यातही आता चार शिक्षकांची बदली झालेली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होणार असून, या शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी विरोधी गटाचे सदस्य पोपटराव सोनवणे यांनी केली. तर आंतरजिल्हा बदलीने ३९ शिक्षक जिल्ह्यात आले असून, त्यापैकी काहींची तेथे नियुक्ती केली जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची काही ठिकाणी टेस्टीग करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी ही टेस्टींग फेल गेलेली आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमिवर टंचाईग्रस्त गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नवीन योजना देऊन पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सदस्य राम भदाणे यांनी केली.