लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळावेत या मागणीसाठी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करून, विभाग नियंत्रकांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाअभावी धुळे जिल्ह्यात दुष्काळ पडला असून, शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. राज्यशासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना नि:शुल्क पासची व्यवस्था केलेली आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येत असतात. प्रवासासाठी ते बसचा वापर करतात. दरम्यान शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पासची व्यवस्था केलेली असली तरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना मोफत पास मिळालेले नाहीत. पाससाठी विद्यार्थ्यांना एस.टी. आगारात ताटकळत उभे राहावे लागते.आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की, महामंडळात पाससाठी चकरा माराव्यात? त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत पास त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रसाद देशमुख, गौरव गीते, हर्षल परदेशी, यश शर्मा,गणेश पवार, गणेश चव्हाण, राहूल मराठे, महेश सूर्यवंशी, पंकज नेरकर,नयन पाटील, भाविक घरटे, नयन बाविस्कर उपस्थित होते.मोराणे येथील थांब्यावरच बस थांबवावीमोराणे येथील समता शिक्षण संस्था संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही विभाग नियंत्रकांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, साक्री-धुळे रस्त्याचे काम सुरू आहे. विद्यार्थी नेहमीच्या थांब्यावर थांबतात,मात्र महामंडळाची बस वेगळ्याच ठिकाणी थांबत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यास अडचण येते. मोराणे गावाच्या थांब्यावरच बसथांबा किंवा बस थांबवा अशी पाटी महामंडळातर्फे लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे यांची स्वाक्षरी आहे.
विद्यार्थ्यांना मोफत पास द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:47 PM