धुळे : रेल्वे स्टेशननजिक केदार सिटी जवळून दुचाकीसह जाणाऱ्या तरुणाला लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर आलेल्या दाेघांनी दुचाकी, मोबाईल आणि काही रोख रक्कम असा १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून घेतला. त्यानंतर तिघांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. रविवारी तिघा अनोळखी तरुणाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
राजस्थान येथील उदय लाल जाट (वय १८, रा. अग्रवाल नगर, मालेगाव रोड, धुळे) या तरुणाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एमएच १८ एक्यू ९०४५ क्रमांकाच्या दुचाकीने रेल्वे स्टेशनजवळील केदार सिटीकडून अग्रवालनगरकडे चालवून नेत हाेता. केदार सिटीचे गेट पास झाल्यानंतर थोड्याच अंतरावर रोडावर अंधाराचा फायदा घेऊन एका अनोळखी तरुणाने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. उदय जाट या तरुणाने त्या अनोळखी तरुणाला लिफ्ट दिली. थाेड्या अंतरावर गेल्यानंतर आणखी दोन तरुण तिथे आले आणि त्यांनी अडविले.
शिवीगाळ करत लिफ्ट दिलेल्या तरुणासह अन्य दोघे अशा तिघांनी मिळून उदय जाट याची लूट केली. त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. लुटणारुंनी दुचाकी, माेबाईल आणि काही रोख रक्कम असा १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून घेत पोबारा केला. या घटनेने घाबरलेल्या तरुणाने स्वत:ला सावरत शहर पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरुणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक डी. पी. उजे करीत आहेत.