धुळे : साक्री तालुक्यातील पेरेजपूर रस्त्यावर दुचाकीने आलेल्या दोघा बकरी चोरांना त्यांचा पाठलाग करून मेंढपाळाने पकडले. ही घटना २२ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी सहा दिवसानंतर चोरीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी रोहन उर्फ बंटी भरत घरटे (वय १९) आणि सचिन नामदेव महाजन (वय २१) (दोघे रा. सामोडे ता. साक्री) या दोघा चोरट्यांवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, साक्री न्यायालयात शनिवारी दोघांना हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. साहेबराव तानु कारंडे (वय ३०, रा. आंबापूर, ता. साक्री) या मेंढपाळाने शुक्रवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, २२ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ॲड. भोसले यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानावर बकऱ्या चरत होत्या. त्याचवेळेस दोन तरुण दुचाकीवर आले. त्यातील एकाने तपकीरी रंगाची १० हजार रुपये किंमतीची बकरी उचलून दुचाकीवरून चोरुन नेली. चोरीची घटना लक्षात येताच चोरट्याचा सर्वत्र तपास करण्यात आला. पण, चोरटे काही मिळून आला नाही. तपास सुरु असतानाच साक्री बाजार समितीत शुक्रवारी बाजार असल्याने चोरुन नेलेली बकरी विकण्यासाठी दोघे तिथे आले होते. त्याचवेळेस साहेबराव कारंडे हा तरुण चोरीला गेलेली बकरी शोधण्यासाठी तिथे आला होता. त्याची बकरी त्याला दिसताच त्यांना दोघांना हटकले. त्याचवेळेस दोघे चोरटे पसार होत असतानाच कारंडे यांनी त्या दोघांचा पाठलाग करुन त्यांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
त्यांच्या विरोधात साक्री पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल फिर्यादीवरून बकरीचोर रोहन उर्फ बंटी भरत घरटे (वय १९) आणि सचिन नामदेव महाजन (वय २१) (दोघे रा. सामोडे ता. साक्री) यांचेवर साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोहेकॉ. बी. एम. रायते करीत आहेत.