लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : कोणताही साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकºयांना २०१७-१८ या चालू वर्षाच्या गाळपासाठी दराबाबत हमीपत्र देत नाही, तसेच मागील वर्षी इतर कारखान्यांनी दिलेल्या अडीच हजार रुपये प्रतिटन या दराप्रमाणे द्वारकाधीश कारखाना १४४ रूपयांचा फरक अदा करत नाही, तोपर्यंत तालुक्यातील ऊस ऊत्पादकांनी ऊस न तोडण्याचा एकमुखी निर्णय साक्री तालुका ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या निर्णयामुळे शेतकरी वर्गाने आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. माजी खासदार बापू चौरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात समितीची बैठक झाली. यावेळी शेतकºयांनी रोष व्यक्त करत प्रवरा सहकारी साखर कारखाना व संजीवनी सहकारी साखर कारखाना यांनी गत वर्षीच्या गाळप हंगामात उसाला अडीच हजार रुपये प्रति टन भाव दिला होता. तर द्वारकाधीश कारखान्याने त्या दरापेक्षा १४४ रुपये कमी दराने ऊस घेतला होता. हा १४४ रुपयांचा फरक ऊस ऊत्पादकांना मिळावा, अशी मागणी ही या बैठकीत करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन द्वारकाधीश साखर कारखाना तसेच वसाका साखर कारखाना यांच्या प्रतिनिधींकडे समितीच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी दिले. याप्रसंगी राज्यातील ऊस उत्पादक व शेतकरी संघटना काय निर्णय घेतात, तोपर्यंत ऊसतोड करावयाची नाही असेही ठरविण्यात आले. या बैठकीस ऊस उत्पादक व जि.प. सदस्य उत्तमराव देसले, जि.प. सदस्य रमेश अहिरराव, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भटू अकलाडे, गुलाबराव नांद्रे, युवराज काकुस्ते, विलासराव भदाणे, विठ्ठल पाटील, देविदास भदाणे, अविनाश पाटील, कैलास सूर्यवंशी, हिलाल भदाणे, किरण देवरे, विजय शिंदे, दत्तात्रय शिंदे, शरद ठाकरे, जगन्नाथ राजपूत, केदा अहिरे, सुरेश हिरे, संदीप निवडणे, युवराज काकुस्ते, प्रकाश पाटील नवडणे, संजय भदाणे, बी.आर भदाणे, सुधाकर भदाणे, भिकन भदाणे शांताराम भदाणे आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.