आॅनलाइन लोकमतधुळे : राज्य शासनातर्फे शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी छायाचित्र काढण्यापुरतेच वृक्ष लावले जातात. त्या लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी कोणी घेत नाही. मात्र धुळे येथील कृषी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने १० झाडे दत्तक घेतली असून त्याचे संगोपन करण्याचीही जबाबदारी या विद्यार्थ्यांनीच घेतल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहायोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे यांनी दिली. पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राज्यात १०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्यानुसार दरवर्षी १ जुलै रोजी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडतो. मात्र काही ठिकाणी तर केवळ छायाचित्र काढण्यापुरतेच वृक्षारोपण होत असते. त्या लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी फारशी कोणी घेताना दिसत नाही. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी यादृष्टीने कृषी महाविद्यालयात झाडांची दत्तक योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्टÑातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात आले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत धुळे येथे असलेल्या कृषी महाविद्यालयात कृषी पदवी व कृषी पदव्युत्तरचे जवळपास ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालयात ‘झाड दत्तक योजना’ यावर्षापासून सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला दहा झाडे दत्तक दिलेली आहेत. दत्तक घेतलेल्या झाडाची जबाबदारी त्या विद्यार्थ्यावरच सोपविण्यात आलेली आहे. या दहा विद्यार्थ्यांच्या समूहामध्ये एक ग्रुप लिडर देण्यात आलेला आहे. काही उणिवा अथवा गरजा असल्यास संबंधित विद्यार्थी या ग्रुप लिडरशी संपर्क साधतो. या उपक्रमामुळे कृषी महाविद्यालयाच्या परिसरात थोडी थोडके नव्हे तर तब्बल पाच हजार वृक्ष महाविद्यालय परिसरात उभी राहणार आहेत. यातील काही वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. त्यात लिंबू, बांबू, सीताफळ, नीलगिरी आदी वृक्षांचा समावेश आहे. परिसर हिरवागार होणारकृषी महाविद्यालयाचा परिसर प्रचंड मोठा आहे. त्यात अगोदरच विविध प्रकारची झाडी लावण्यात आलेली आहे. झाड दत्तक योजनेमुळे त्यात अधिक भर पडून महाविद्यालयाचा परिसर अजून हिरवागार होण्यास मदत होणार आहे.
कृषी महाविद्यालयात झाड दत्तक योजना सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने १० झाड दत्तक घेतली आहे. या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही विद्यार्थ्यांचीच आहे. डॉ. अशोक मुसमाडे,सहयोगी कृषी अधिष्ठता,कृषी महाविद्यालय, धुळे