शिरपूर : इंदूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता त्यात चनाडाळ व हार्डवेअरच्या साहित्यासोबतच गुटख्याचा साठा सांगवी पोलिसांनी केलेल्या तपासणीत आढळून आला. १२ लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल व २० लाखांचा ट्रक असा एकूण ३२ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.़ याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे़मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इंदूरकडून धुळ्याच्या दिशेने एक ट्रक जाणार असून त्यात गुटखा सदृष्य पदार्थ असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पडताळणी करुन पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, नरेंद्र खैरनार, कर्मचारी लक्ष्मण गवळी, योगेश दाभाडे, योगेश मोरे, गोविंद कोळी यांचे पथक सज्ज करण्यात आले़ रविवारी पहाटेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेक पोस्ट नाका परिसरात सापळा लावण्यात आला़ प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे काम सुरु करण्यात आले़ त्याचवेळेस इंदूरकडून धुळ्याच्या दिशेने जाणारा एमएच १८ बीजी ११०१ क्रमांकाचा १२ चाकी ट्रक पथकाला दिसला़ मिळालेल्या माहितीनुसार तोच ट्रक असल्याने पथकाने लागलीच या ट्रकला बाजुला घेतले़ ट्रकमध्ये काय आहे, अशी चालकाकडे विचारणा केली असता त्यात चनाडाळ आणि हार्डवेअरचे साहित्य आहे़ हे साहित्य इंदूर येथून आणले असल्याचे चालकाने सांगितले़त्यानंतर कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची संयुक्तिक कागदपत्रे आढळून आली नाही़ ट्रकची तपासणी सुरु केल्यानंतर पाऊस आल्यामुळे तपासणी थांबविण्यात आली़ पाऊस थांबल्यानंतर पुन्हा तपासणी केली असता ट्रकमध्ये हार्डवेअरचे साहित्य आणि चना डाळीच्या पोत्याखाली लपवलेल्या अवस्थेत गुटखा व तंबाखूजन्य माल मिळून आले़ तो बाहेर काढून त्याची मोजणी केली असता १२ लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीचा विमल पान मसाला, व्हि १ कंपनीचा तंबाखूजन्य गुटखा व प्रतिबांधित सुंगधी सुपारी असे एकूण ५२ पोते आणि २० लाख रुपये किंमतीचा १२ चाकी ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला़ गाडी चालक शाम मोहनलाल मोर्या व सहचालक बलराम मानसिंग बशानीया (दोन्ही राहणार कनोद जि़देवास-मध्यप्रदेश) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२८, २७२, २७३ सह तंबाखु उत्पादने प्रतिबंधक अधिनियम कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली़
चनाडाळच्या ट्रकमध्ये गुटख्याचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:55 PM