राजेंद्र शर्मा -धुळे : शहरातील साक्री रोडवर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून कारमधून नेण्यात येणारा ७९ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा आणि १ लाख ४० हजारांची कार, असा एकूण २ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यासंदर्भात शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पाेलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त माहिती मिळाली होती.
साक्री रोडवरून कारमधून बेकायदेशीररीत्या सुगंधी पान मसाला आणि तंबाखू मालाची वाहतूक होणार आहे. त्यानुसार शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास साक्री रोडवरील सुरेंद्र दूध डेअरीजवळ सापळा रचला. काही वेळाने एमएच १८ टी १२५३ क्रमांकाची कार येताना दिसली. त्यांनी कार अडविली. कारची तपासणी केली असता पोलिसांना कारमध्ये गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चालक नितेश प्रकाशलाल आहुजा (२९), रा. कुमारनगर याला आणि कारसह सर्व गुटखा जप्त केला. कारमध्ये ५ दोन मोठ्या गोण्या आणि सहा लहान गोण्यांमध्ये सुंगधीत पान मसाल्याचे पाऊच आढळून आले.
याशिवाय ९ हजार ९०० आणि ११ हजार ८८० रुपये किमतीचे सुंगधित मसाल्याचे पाऊच आढळून आले. याशिवाय १ हजार ३२० रुपये किमतीची सुंगधित तंबाखू जप्त करण्यात आली. याशिवाय १ लाख ४० हजार किमतीची कार, असा एकूण २ लाख १९ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. कार चालकाला ताब्यात घेतले आहे.