धुळे: सेंधव्याकडून शिरपूरकडे येणाऱ्या एका वाहनातून शिरपूर पोलिसांनी साडेआठ लाखांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर मंगळवारी सकाळी केली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ट्रकही जप्त केला आहे.
सेंधव्याकडून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकमधून (क्र.डीएल ०१-जीसी ५१५४) महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा रचला. मंगळवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास संशयित ट्रक येताना दिसताच पोलिसांनी तो अडविला.
ट्रकची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी ८ लाख ६७ हजार २०० रुपयांचा गुटखा व १५ लाखांचा ट्रक असा एकूण २३ लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणीचालक सद्दाम मुनीजर (वय ३२), क्लिनर मो. बिलाल फजरखान, (वय २७, दोन्ही रा. फिरोजपुर, जि. नुहू हरियाणा) यांच्याविरुद्ध शिरपूर शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे