धुळे : शहरातील नंदी रोड भागातील एका दुकानात लपवून ठेवलेला १ लाख ६० हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी पकडला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्याासह पथकाने केली. आझादनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी सुरू आहे. शहरातील मच्छि बाजार परिसरात असलेल्या नंदी रोडवर एक व्यक्ती त्याच्या दुकानात विमल गुटख्याचा साठा करून आहे, अशी गोपनीय माहिती शहर उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांना मिळाली. माहिती मिळताच शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नंदी रोडवरील त्या दुकानात पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी १ लाख ६० हजार रुपये किमतीचा विमल आणि ए वन गुटख्याचा साठा मिळून आला. पथकाने सर्व मुद्देमाल जप्त केला असून, तेथून दोन जणांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, कर्मचारी कबीर शेख, रमेश उघडे, कर्नल चौरे, अकिला शेख, सोनाली बोरसे, देवेंद्र काकडे, अतुल पवार यांनी केली. छापा पडल्याची माहिती मिळताच आझादनगर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले.