राजेंद्र शर्मा
शिरपूर : मुंबई - आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ सांगवी पोलिसांनी प्रतिबंधित १ लाख ८७ हजार २०० रुपयांचा गुटखा व १५ लाखांचा ट्रक असा एकूण १६ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २५ एप्रिल रोजी दुपारी केली. याप्रकरणी एकाविरूद्ध सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदूरकडून येणाऱ्या वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार यांनी हाडाखेड आरटीओ तपासणीनाक्याजवळ संशयित ट्रक (क्र. आरजे - जीबी १२४२)ची तपासणी केली. या ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला. पथकाने १ लाख ८७ हजार २०० रुपयांचा गुटखा व १५ लाखांचा ट्रक असा एकूण १६ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक बिजेंद्रसिंग रामबाबू मीना (वय ३१, रा. भिरामद, ता. सरमथला जि़धौलपूर, राजस्थान) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. सांगवी पोलिसांनी गुटखा व ट्रक जप्त केला. दरम्यान, आरटीओ चेकपोस्टजवळ झालेल्या या कारवाईत सपोनि. सुरेश शिरसाठ, पोसई कृष्णा पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.