धुळे: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दाऊळ येथे तरुणाची आत्महत्याशिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथील अविनाश नाना पवार (वय २६) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास अविनाश हा घरातून निघून गेला होता. घरी तो वेळेत आला नाही, परिणामी त्याचा शोध घेण्यात आला. रात्रभर त्याचा शोध सुरू होता. अशातच १८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या झाडाला स्वत:च्या अंगातील शर्टाचा आधार घेऊन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. लोकांच्या मदतीने त्याला खाली उतरुन खासगी वाहनाने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. तेजस जैन यांनी तपासून मयत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. घटनेची नोंद दोंडाईचा पोलिस ठाण्यात करण्यात आली.
मल्ल्याचापाडा येथे तरुणाचा गळफाससाक्री तालुक्यातील मल्ल्याचापाडा येथील दीपचंद बालू पवार (वय २१) याने गळफास लावून आत्महत्या केली. दीपचंद याने राहत्या घराच्या छताच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. घटना लक्षात येताच त्याला लोकांच्या मदतीने खाली उतरुन पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. भामरे यांनी तपासून मयत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.