राजेंद्र शर्मा
धुळे - शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील सेवानिवृत्त शिक्षकाचे गट विमा योजनेचेे 1 लाख 33 हजाराचे बिल उपकोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी चार हजाराची लाच स्विकारतांना मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडण्यात आले.
शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील सेवानिवृत्त शिक्षकाकडून त्यांच्या गट विमा योजनेचे मंजूर झालेले १ लाख ३३ हजार ४८४ रुपयाचे बिल अदा करण्यासाठी शिंदखेडा येथील उपकोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी ५ हजाराची लाच मागितली होती. यासंदर्भात सेवानिवृत्त शिक्षकाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनीवरुन तक्रार केली होती. त्याप्रमाणे विभागाच्या पथकाने दोंडाईचा येथे जाऊन तक्रार सेवानिवृत्त शिक्षकांची तक्रार घेतली.
तक्रारीची १ जानेवारी रोजी दुपारी पडताळणी केली. तेव्हा मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांना तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षकाकडून तडजोडीअंती ४ हजाराची लाच स्वीकारत असतांना रंगेहात पकडले. त्यांच्याविराेधात दोंडाईचा पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर या पथकाने केले. गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.