साक्री : तालुक्यात दोन महिन्यात परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कुठे काढणीला आलेल्या पिकाला कोंब फुटले तर कुठे वाळवीने मक्याची कणसेच फस्त केली. यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाला आहे.साक्री तालुक्यातील छडवेल पखरून, अष्टाने, पेरेजपूर, सुरपान, कावठे, कासारे, मालपूर, धाडणे, नवडने, सामोडे, घोडदेसह संपूर्ण तालुक्यातील गावांमधील शेत शिवारातील सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजरी, मका ही पिके काढणीची वेळ होती. मात्र, पावसाने उघडीप न दिल्याने तालुक्यातील एकाही शेतकºयाला वेळेवर कापणी करता आली नाही.मका पिकावर उगवल्यापासूनच लष्करी अळीने हल्ला चढवला होता, तो थेट मक्याच्या भुट्टयांमध्येही अळीने पन्नास टक्के दाणे खाऊन टाकले होते. मात्र, जे काही शेतात मक्याचे पीक अळीच्या प्रादुभार्वानंतरही तग धरून होते. तेही सततच्या पावसाने आडवे झाले.जास्त दिवस मक्यासह कोणतेच पीक उभे राहू न शकल्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के बाजरी व मका पीक भुईसपाट झाले. कणसांना कोंब फुटले आहेत. जे काही शेतात मक्याचे कणसे खाली मातीत लोळत आहेत, त्यांनाही सध्या वाळवी कीटक लागल्याने प्रत्येक शेतकरी या खरिपात तिसऱ्यांदा संकटात सापडला आहे.काही शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. सततच्या अति पावसामुळे प्रत्येक शेतात प्रचंड तण वाढले आहे. सध्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली. मात्र, कोणत्याही गावात मजूर मिळत नसल्याने आणि प्रत्येक गावातील मजूर गुजरात राज्यात गेल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. हातातोंडाशी आलेला घास ओल्या दुष्काळाने हिरावला आहे.चाळीस ते पन्नास टक्के शिल्लक राहिलेल्या मक्याला वाळवीसारख्या कीटकांनी खाणे सुरु केल्याने कोणत्याही शेतकºयाला घरापर्यंत उर्वरित धान्य पोहोचेल कि नाही, याची शंकाच आहे. घरातलं होतं तेवढं भांडवल टाकूनही काहीही उत्पन्न हातात येणार नसल्याने शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी छडवेल पखरून येथील प्रभाकर पवार, बापूसाहेब भंडारी, भालचंद्र पवार, बाबुलाल पवार, जगन्नाथ पवार, किशोर पाटील आदींसह शेतकºयांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे ‘वाळवी’ने केला मका फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:16 PM